लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात एकविरा फाउंडेशनच्या तब्बल ५५० युवक-युवतींनी यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना मदत करत निर्माल्याचे संकलन, साफसफाई व सुरक्षिततेची मोठी जबाबदारी पार पाडली. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी संगमनेर शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळांचे गणपती तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन प्रवरा नदीकाठी करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या सोयीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरण पूरक संदेशासाठी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील विशेष उपक्रम राबवण्यात आला.

संगमनेर शहरात व तालुक्यातील अनेक गावांमधील भाविक प्रवरा नदीकाठी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर एकविरा फाउंडेशन व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा नदीकाठी मोठी व्यवस्था करण्यात आली. गंगामाई घाट, म्हाळुंगी नदीचा काठ तसेच जाणता राजा मैदानावर कृत्रिम तळे तयार करून नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर विसर्जनाची सोय देण्यात आली. यावेळी ५५० युवक-युवतींनी ५०-५० च्या गटांमध्ये उभे राहून नागरिकांना मदत केली. भाविकांना पूरस्थितीबाबत माहिती देणे, निर्माल्याचे संकलन करणे, वाहतूक व्यवस्थेत सहकार्य करणे, तसेच वृद्ध व महिलांना विसर्जनात मदत करणे अशी महत्त्वाची कामे या युवकांनी केली.

नदीकाठी खोल पाणी असल्याने दुर्घटना घडू नयेत म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने कन्हेअर बसवण्यात आला. या यांत्रिकी माध्यमातून मूर्तींचे विसर्जन सुरक्षित व जलदगतीने पार पडले. तसेच, नदीकाठी सुरक्षारक्षक, पोहणारे युवक, प्राथमिक उपचाराची व्यवस्था, तसेच भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक अशा सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या उपक्रमात लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ. सुधीर तांबे, आ.सत्यजित तांबे व संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी युवकांच्या कार्याचे कौतुक करत एकविरा फाउंडेशनचा उपक्रम हा संगमनेरच्या सामाजिक जाणीवेचा आदर्श असल्याचे सांगितले.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की “एकविरा फाउंडेशनने गेल्या सात वर्षांपासून विसर्जनावेळी नागरिकांना मदत करण्याबरोबरच निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. युवकांचा स्वयंस्फूर्त सहभाग हे कौतुकास्पद काम आहे. या सेवेमुळे नागरिक सुरक्षिततेने विसर्जन करू शकतात आणि पर्यावरण पूरक संदेश समाजात जातो.तसेच आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, “गणेशोत्सव दहा दिवस घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण करून जातो. शेवटच्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने विसर्जनासाठी नदीकाठी येतात. अशावेळी एकविरा फाउंडेशनचे सर्व सदस्य सेवा देत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

थोरात कारखान्याच्या मदतीने यांत्रिकी विसर्जनामुळे दुर्घटना टाळण्यात मोठी मदत झाली आहे. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की “लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन महिला सबलीकरणाबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने काम करत आहे. विसर्जनानंतर निर्माल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरते, रोगराई वाढते. त्यामुळे युवक-युवती स्वच्छतेत पुढाकार घेतात आणि आरोग्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचवतात. गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा उत्सव असला तरी विसर्जनावेळी निर्माण होणारे प्रदूषण आणि अस्वच्छता हा गंभीर मुद्दा आहे. एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून 550 युवक-युवतींनी केलेल्या सेवेमुळे या समस्येवर उपाय मिळाला. निर्माल्याचे योग्य संकलन झाल्यामुळे नदी परिसर स्वच्छ राहिला आणि नागरिकांना विसर्जन सोयीस्कर झाले.

त्यामुळे एकविरा फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ संगमनेरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक जाणिवेचे अनोखे उदाहरण ठरले आहे.
