किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला) स्वच्छता व संवर्धन मोहिम
आजच्या धकाधकीच्या युगात निसर्ग, इतिहास आणि आपली परंपरा यांचं भान ठेवत समाजाला एकत्र आणणारे उपक्रम समाजाच्या प्रबोधनासाठी महत्त्वाचे ठरतात. याच धर्तीवर शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी खा. निलेश लंके यांच्या संकल्पनेतून तसेच ‘आपला मावळा’ संघटना आणि एकविरा फाउंडेशनच्या पुढाकारातून अकोले तालुक्यातील ऐतिहासिक विश्रामगड (पट्टा किल्ला) येथे गडकिल्ले स्वच्छता,संवर्धन आणि जतन मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत संगमनेर तालुक्यासह परिसरातील इतिहासप्रेमी, महिला, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

संगमनेरहून निघालेल्या सर्व सहभागींचा प्रवास गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर एक वेगळाच अनुभव देणारा ठरला. तो अभेद्य किल्ला, डोंगराळ परिसर आणि निसर्गसौंदर्य पाहून सर्वजण थक्क झाले. गड सर करताना प्रत्येकाच्या मनात इतिहासाच्या असंख्य पाऊलखुणा जाग्या झाल्या. गड सर केल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर खा. निलेश लंके यांच्या उपस्थितीत आई जिजाऊंना वंदन करण्यात आलं. या प्रसंगी सर्व सहभागी मावळ्यांनी गडकिल्ल्यांच्या जतनासाठी शपथ घेतली.

इतिहासाच्या पवित्र साक्षीने घेतलेली ही शपथ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक रंगतही अनुभवायला मिळाली. लहान मुलींच्या ग्रुपने सादर केलेलं कथक नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ताल-लय-सूरांच्या या सुरेख सादरीकरणाने वातावरण भारावून गेलं. तसेच चिमुकल्यांनी दिलेल्या ‘शिवगर्जने’ने उपस्थित मावळ्यांचा उत्साह दणाणून गेला होता.स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन हाच मोहिमेचा गाभा असल्याने गडावरील कचरा गोळा करण्याचं काम ‘आपला मावळा’ संघटना तसेच एकविरा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक तरुणांनी जबाबदारीने पार पाडलं. त्याचबरोबर वृक्षारोपण करून हिरवाई वाढविण्याचं कार्यही करण्यात आलं.

या उपक्रमामुळे गड फक्त स्वच्छ झाला नाही तर पर्यावरणपूरक संदेशही समाजापर्यंत पोहोचला. गड उतरल्यावर सर्व सहभागी मावळ्यांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या सामूहिक भोजनामुळे परस्परांमधील मैत्री आणि बांधिलकी अधिक दृढ झाली. श्रमदानाची थकवा विरघळून उत्साह आणि प्रेरणा मनामध्ये घर करून गेली.खा. निलेश लंके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही गडकिल्ले संवर्धनाची चळवळ ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून पुढे नेत समाजात एक वेगळा संदेश देत आहे.

गडकिल्ले हे आपल्या इतिहासाचे वैभव आहेत. त्यांचं जतन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे भान या उपक्रमातून अधिक दृढ झालं. दिवसभर संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिक, महिला, तरुण, इतिहासप्रेमी आणि ज्येष्ठ मंडळी गडावर श्रमदानासाठी एकत्र जमली आणि त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता एकतेचा, परंपरेच्या जतनाचा आणि समाजातील सकारात्मक बदलाचा ध्यास घेणारा ठरला.

या मोहिमेचा शेवट प्रेरणादायी घोषणांनी झाला “जय भवानी, जय शिवाजी!”गडकिल्ल्यांच्या पवित्र भूमीवरून उमटलेली ही घोषवाणी प्रत्येकाच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करून गेली. पुढील काळात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोक सहभागी होतील आणि गडकिल्ले संवर्धनाची ही चळवळ वटवृक्षाप्रमाणे बहरत राहील, असा निर्धार सर्व सहभागी मावळ्यांनी व्यक्त केला.

